विशाल एका आयटी कंपनीमध्ये उच्च पदावर असणारा पस्तीस ते सदतीस वर्षांचा. बायको प्रणाली सुद्धा इन्शुरन्स कंपनीमध्ये चांगल्या पदावर. पुण्यात थ्री बी एच के फ्लॅट, महागडी गाडी इंग्लिश स्कूलमध्ये शिकणारा ९ वर्षांचा मुलगा. “रुद्र”. एका अर्थाने सर्व सुख सोयी असणारे कुटुंब. पण लग्नाला बारा वर्षे झाली तरी संसारात म्हणावा तसा सूर लागला नव्हता.
लग्नानंतर काही वर्षातच छोट्या-मोठ्या गोष्टीवरून प्रणाली आणि त्याच्यामध्ये वाद व्हायला लागले. ठोस मोठं कारण असं काहीच नव्हतं. एकमेकांपासून ते मनाने कधी दूर गेले त्यांचे त्यांना देखील समजलं नाही. मग ऑफिसमध्ये जास्तीचं काम, मित्रांबरोबर पार्टी अशी कारण काढून विशाल घरी उशिरा यायला लागला. नात्यांमध्ये गोडवा निर्माण करण्यासाठी विशाल ने फारसे प्रयत्न केले नाहीत.
खरं तर प्रणाली कडूनही ते झाले नाहीत. त्या दिवशी शुक्रवार होता. विशालला सकाळीच त्याच्या कॉलेजच्या जुन्या मित्राचा म्हणजेच निखिल चा फोन आला. “विशल्या काय करतोयस”? आज मी पुण्यात आलोय दोन दिवसासाठी. रात्री भेटूयात का ? विशाल लगेच हो म्हणाला. कारण लवकर घरी जाण्याची त्याची फारशी इच्छा नव्हती आणि निखिल ला सुद्धा खूप दिवसांनी भेटणार होता.
निखिल म्हणजे कॉलेजच्या ग्रुप मधला हिरो होता. बॉडी बिल्डिंगची आवड आणि करिअर सुद्धा जिम ट्रेनर म्हणून. त्याच्या पर्सनॅलिटीवर कॉलेजच्या 95 टक्के मुली फिदा होत्या. खास करून त्याच्या केसांवर. निखिलच सुद्धा स्वतःच्या केसांवर नितांत प्रेम. त्याची आणि शिवानीची ओळख कॉलेज मधली, पुढे प्रेम आणि लग्न, खरंतर शिवानी एकदम हळव्या स्वभावाची आणि,
निखिल उद्धटपणा व स्पष्ट वक्तेपणा त्यांच्या सीमा रेषेवर असणारा. साडे आठ वाजता कर्वे रोड येथील हॉटेल वुडलैंड मधे भेटायचे ठरले. विशाल थोडा वेळेच्या आधीच पोहोचला होता. थोड्याच वेळात निखिल तिथे पोहोचला, नेहमीप्रमाणे स्पोर्ट्स वेअर मध्ये फक्त आज थोडा बदल म्हणजे नायकीची टोपी. इकडच्या तिकडच्या गप्पा झाल्या निखिलला लक्षात आलं विशालच काहीतरी बिनसलंय हे लक्षात येताच,
निखिलने विचारले, विशाल! कॉलेजच्या गप्पा खूप झाल्या, घरचे सगळे बरे आहेत ना ? प्रणाली काय म्हणते आणि आपला छोटू कितवीला आहे ? विशालला प्रणालीचा फोन आला पण त्याने तो उचलला नाही. खरंतर त्याआधी ऑफिस मधून जे कॉल्स आले ते सगळे विशालने दुर्लक्षित केले होते. हे निखिलच्या नजरेतून सुटलं नाही. विशाल अरे फोन उचल की, नाही नको उगाच प्रश्न विचारत बसेल विशाल उत्तरला.
विशाल सगळं ठीक आहे ना निखिलने विचारलं. मग विशालने बोलायला सुरुवात केली. अरे काय सांगू मी आणि प्रणाली एकत्र राहतो पण मनाने आम्ही एकमेकांपासून खूप दूर गेलो आहोत. नक्की काय झाले विशाल ? निखिलनी विचारलं. अरे छोट्या-छोट्या गोष्टीवरून आमचे खटके उडतात. एकमेकांना समजून घेण्याची प्रक्रिया आमची थांबली आहे असं वाटतं.
साधा शू रॅक घेताना सुद्धा आमचं एकमत होत नाही. मी जे म्हणीन त्याला ती नाही म्हणते आणि ती जे म्हणेल त्याला मी सहमत होत नाही. कळत नाही काय करायचं ? घरात एक प्रकारची शांतता असते. कामापुरतं बोलतो, शा-रीरिक गरजा भा-गवण्यासाठी कधीतरी एकत्र येतो. माझ्या मुलाला रुद्रला पण आमच्यातला तणाव आता जाणवायला लागला आहे.
त्याच्याही मनावर या सगळ्याचा नकळत परिणाम होत असेलच की, एवढं बोलून विशाल थांबला आणि निखिलकडे अपेक्षेने बघायला लागला. निखिलची प्रतिक्रिया अजबच होती. तो जोर जोरात हसायला लागला. अरे वेडा आहेस का हसतो काय मी तुला गंभीर काहीतरी सांगतोय आणि तू हसतोय काय ? विशाल चिडून म्हणाला. अरे हसू नको तर काय करू ? मूर्ख आहात तुम्ही दोघेही, त्या प्रणालीला पण फोन करून झापणार आहे मी, अरे तुमच्या दोघांचं इतकं चांगलं करिअर आहे.
सर्व सुख सोयी असून पण काय रडताय रे, सुख दुख: आहे का तुम्हाला ? तुमच्या आवडी-निवडी जुळत नाहीत हे काय भांडणाचं कारण नाही होऊ शकत. दोघांपैकी एकही जण माघार घ्यायला तयार नाही कारण मी कमीपणा का घेऊ ? मी नमत का घेऊ ? हा अहंकार. नातं टिकवायचा आहे की, अहंकार हे तुमचं तुम्हालाच ठरवावे लागेल. एकदा नीट बोलून तर बघ तिच्या बरोबर. तर निखिल म्हणाला अरे मीच का बोलू ? विशाल म्हणाला अरे असं का म्हणतोय सुरुवात कोणीतरी केली पाहिजे ना.
असं म्हणत निखिल हे डोक्यावरची टोपी काढली आणि त्याच्याकडे बघून विशालला धक्का बसला कारण निखिलची सगळ्यात आवडती गोष्ट म्हणजे त्याचे केस पूर्ण काढले होते, टक्कल केलं होतं. निखिल सगळं ठीक आहे ना ? टक्कल का केला आहेस ? विशालने विचारले. त्यावर निखील म्हणाला, अरे जास्त कोणाला सांगितलं नाही पण काही महिन्यांपूर्वी शिवानीला ब्रे-स्ट कॅन्सर डि’टेक्ट झाला.
फर्स्ट स्टेजला समजलं, पण ते बाकी सारे सोपस्कार आलेच ना रे रेडिएशन, केमोथेरपी, गोळ्या औ-षध त्यामुळे तिचे केस जायला सुरुवात झाली. ती काही दिवस आरशात सुद्धा बघत नव्हती. मग मी पण टक्कल केलं म्हटलं तिचे केस जोपर्यंत पूर्णपणे येत नाहीत तोपर्यंत मी टकलाच राहणार. असं म्हणत निखिलनी बिल मागवलं. विशाल आश्चर्यचकित होऊन नुसता त्याच्याकडे बघत होता..