अनिरुद्ध आणि देविका नेहमीप्रमाणे जॉबला जाण्यासाठी सकाळी तयारी करीत होते. दोघेही गडबडीत होते. इतक्यात दाराची बेल वाजली आणि अनिरुद्ध दार उघडण्यासाठी गेला. तर त्याच्यासाठी एक कुरियर आले होते. सही करून त्याने ते पार्सल आपल्या ताब्यात घेतले. तो आत आला तोच देविका त्याला विचारू लागली, कोणाचे पार्सल आले आहे रे? बघतो असे म्हणत अनिरुद्ध ते पार्सल उघडू लागला. त्यामध्ये एक पॅक केलेला मोबाईल आणि तीन पानी लिहिलेले पत्र होते.
तो मोबाईल ओळखीचा दिसला. अरे हा तर तुझ्या आईचा मोबाईल आहे ना? देविकाने लगेच अनिरुद्धला विचारले. हो, हे पत्र देखील तिनेच पाठवले असेल असे म्हणत तो पत्र वाचण्यासाठी सोफ्यावर बसला. त्याने पत्र वाचायला सुरुवात केली. देवी काही त्याच्या शेजारी बसून ऐकू लागली. प्रिय अनु, कसा आहेस रे बाळा? सुनबाई आणि नातवंडे बरी आहेत ना? खुप आठवण येते रे तुमच्या सगळ्यांची. जीव तरसतो रे तुम्हाला भेटण्यासाठी. पण मी तरी काय करणार नाईलाज.
परवा व्हाट्सअप वरती मातृदिनानिमित्त लिहिलेला तुझा संदेश वाचून खूप बरे वाटले. अजून थोडे तरी प्रेम शिल्लक आहे हे पाहून जीवाला अगदी समाधान वाटले. अजून नाळ तुटली नाही याचे समाधान. फेसबुक वरचे सुद्धा तुझे मातृदिनानिमित्तचे सुंदर संदेश वाचले. शंभरच्यावर लाइक्स आणि कमेंट्स पाहून आनंद वाटला. मी जाणून बुजूनच तुला प्रति उत्तर नाही दिले. चुकून जर कोणीतरी विचारले हे कोण म्हणून तर तुला आणि अवघड वाटायचे ही माझी आई आहे असे सांगायला.
तुला लाज वाटू नये म्हणूनच मी काही बोलले नाही. पण हेच सारे संदेश तू मला जवळ घेऊन सांगितले असतेस तर, माझ्या आनंदाला पारावर उरला नसता. खरंच मला खूप बरे वाटले असते. असो, माझ्याकडूनच काही कमी पडले असेल तुला. कदाचित संस्कार.. पण असो! कालच तुझा आणि सून बाईंचा तुझ्या बंगल्यातील कोणत्या तरी वृद्धाश्रमाला देणगी देतानाचा फोटो पाहिला. खूप आनंद झाला ते पाहून.
तू इतर वृद्ध लोकांना मदत करत आहेस हे पाहून खूपच बरे वाटले. तू खूपच स्मार्ट झाला आहेस. सुनबाई पण देखणी दिसत आहे. मला ना अचानक तू लहान असतानाचा एक प्रसंग आठवला. मला खूप ताप आला होता. आणि तू माझी खूपच काळजी घेतली होतीस. तू माझी घेतलेली काळजी पाहून आजूबाजूचे लोक म्हणत होते जीजी, तुम्ही खूपच भाग्यवंत आहात, तुम्हाला असा मुलगा मिळाला आहे. इतकी काळजी घेणारा, तुम्हाला इतका जपणारा.
हा मोठा झाल्यानंतर तुम्हाला काहीच काळजी नसेल. खूप चांगले सांभाळेल हा तुम्हाला. खरच नशीबवान आहात तुम्ही! त्यावेळी मला तुझा खूपच अभिमान वाटला होता. पण दुर्दैवाने, त्यावेळी असे म्हणणारे लोक आता जिवंत नाहीत. पण त्यावेळी मला जरा सुद्धा असे वाटले नव्हते की तू आणि मी असे वेगवेगळे राहू. बाळा, तुला मोठे केले शिकवले. तसा तू मूळचा हुशारच होतास. फक्त आम्ही तुला सगळ्या सुविधा पुरवल्या.
तुझ्या हुशारीवर तू परदेशात जाऊन आलास. तुला भल्या मोठ्या पगाराची नोकरीसुद्धा लागली. तुझ्या आवडत्या मुलीशी तुझे लग्न देखील लावून दिले. सगळे तुझ्या मनाप्रमाणे झाले. मला सुंदर अशी दोन नातवंडे मिळाली. अगदी सोन्यासारखी. सगळे अगदी सुखात होते. खूप छान सुखात, आनंदात दिवस जात होते. पण दुर्दैवाने अचानक तुझे वडील आपल्या सर्वांना सोडून गेले. माझ्यावर तर दुःखाचा डोंगर को सळला. थोड्या दिवसा नंतर नातवंडांच्यात मन रमवून घेऊ लागले. कालांतराने यांचा विसर पडत होता.
सर्व सुरळीत चालले होते. पण अचानक तुला परदेशातून नोकरीसाठी कॉल आला.आणि तू सुन आणि नातवंडांना घेऊन परदेशात निघून गेलास. आणि जाता जाता माझी एका सुसज्ज वृ द्धाश्रमात सोय करून गेलास. परत आलो की तुला घेऊन जाईन असे आश्वासन देऊन गेलास. त्या आशेवरच मी जगत होते. आज येशील उद्या येशील असे म्हणत किती वर्षे गेली. त्यावेळची ती भेट शेवटची असेल असे वाटले नव्हते मला. नंतर तू परत आलास असे संस्थाचालकांकडून कळाले.
तू दिलेला पंधरा लाखांचा चेक पण कळाला. खूप किंमत लावलीस रे तू आईच्या मायेची. पण तू मला इथे ठेवले, खूप उपकार झाले तुझे माझ्यावर. तुझ्या जवळ राहिले असते तर त्या चार भिंतींमध्ये माझे जग असते. पण इथे आल्यानंतर मला, समवयस्क आणि समदुःखी मित्र मैत्रीण मिळाले. त्यांच्याजवळ आपले सुख दुःख बोलून खूप मोकळे वाटते. त्यांच्यात राहून मी आता मजेत आहे. तुझ्या पंधरा लाखांनी माझी चांगलीच बडदास्त ठेवली आहे.
मला आता तुमची आठवण देखील येत नाही. पण अधून मधून सोनू मोनू आठवतात. मोठे झाले असतील ना रे ते? त्यांना माझी आठवण येते का रे? सुनबाई अजून सुद्धा जॉब करते का रे? आता हे सारे प्रश्न विचारून काय उपयोग म्हणा. यापुढे आपली भेट होणे शक्य नाही. कारण तुला जेव्हा हे पत्र मिळेल तोपर्यंत मी या जगात नसेल. अरे, आम्ही म्हातारी माणसे तुमच्या पैशांची, किमती वस्तूंची नाही तर मायेच्या चार शब्दांचे भुकेले असतो रे. म्हणूनच हा मोबाईल परत पाठवत आहे.
म्हातारपणी आमची एवढीच इच्छा असते, आपल्या मुलांना मोठे झालेले, सुखात असलेले पाहायचे. आपल्या नातवंडांना मांडीवर घेऊन खेळवायचे, त्यांच्या बाललीला पाहत राहिलेले म्हातारपण घालवायचे. पण पैशांच्या मागे लागलेल्या तुम्हाला याची कुठे जाणीव असते? केवळ पैसा हेच सर्वस्व मानू नका. माणसासाठी पैसा असतो पैश्यासाठी माणूस नाही. पण जाऊ दे, आता वाटते माझेच संस्कार कुठेतरी कमी पडले असतील.मुलेही मातीच्या गोळ्याप्रमाणे असतात. त्यांना जसा आकार देईल तसे ते घडत जातात.
त्यामुळे मी तुला आणि सुनबाईला दो ष देतच नाही. तुम्ही सर्वजण सुखात आनंदात राहा हाच आशीर्वाद आणि अंतिम इच्छा. शेवटी तुला एकच प्रश्न विचारते, बघ जमलं तर स्वतःलाच उत्तर दे. नोकर माणसे आणि कुत्र्यांना तुझ्या बंगल्यात जशा खोल्या बांधल्या तशीच एखादी खोली आई साठी बांधता आली नाही का रे? तुझीच आई. मित्रांनो शेवटी एकच वाक्य, आई-वडिलांना सांभाळा कारण ते तुमचे सर्वस्व आहेत. या जगात आई- वडिलांन एवढे प्रेम कोणीच करू शकत नाही .